सध्या पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून दुसरी लाट जास्तच धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंखेमध्ये झपाट्याने वाढ होत असून पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्युदरही जास्त असल्याचे
निदर्शनास येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांचे विलगीकरण करणे तसेच त्यांना त्याठिकाणी आवश्यक सुविधा प्राप्त करून देण्याचे काम देशभरात जवळपास सर्वच पातळीवर हाती घेण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाचे आरोग्य व इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यासाठी मेहनत घेत आहेत. सर्वपक्षीय नेते, कंपन्या, सामाजिक संस्था व उद्योजकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. *देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था* याकामी भरीव मदत करत आहे. *संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्रजी माने* यांच्या पुढाकारातून तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा व कोरोना रुग्णांना विविध प्रकारे सहकार्य करण्यात येत आहे.देवरुख येथे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांसाठी नव्याने ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याकरिता *मा. रवींद्रजी माने यांनी २५० बेड्स* उपलब्ध करून दिले आहेत.
मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये या संस्थेने आपली साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूलची इमारत उपलब्ध करून दिली होती. या इमारतीमध्ये तालुक्याच्या आरोग्य विभागाचे रुग्ण विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले होते.त्याचबरोबर या संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विलगीकरण केंद्रासाठी *आर एफ द्वारा नियंत्रित कार्टची* निर्मिती केली. विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचा-यांना रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. मात्र रुग्णाशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असतो. याच अनुषंगाने महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी ज्ञान व उत्पादन सुविधा वापरून कार्ट बनविण्यात आल्या. मा. जिल्हाधिकारी, श्री. लक्षीनारायण मिश्रा व संगमेश्वर तहसीलदार, मा. सुहास थोरात यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यांचा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण (कामथे), खेड (कळंबणी), दापोली या ठिकाणच्या शासकीय रुग्णालये व विलगीकरण केंद्रात वापर करण्यात येत आहे. ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे २०० मीटरपेक्षा अधिक अंतर आणि जवळपास ८० किलो पर्यंतच्या वजनाची सामग्रीची ने आण करणे शक्य होते आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी संस्थेने कोविड – १९ योद्धा सन्मान शिक्षण योजना आपल्या आंबव येथील अभियांत्रिकी पदवी महाविदयालय, एम बी ए व पॉलीटेक्निकमध्ये लागू केली व कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या कोविड योध्यांचा
यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई,मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील हॉस्पिटल,पोलीस दल नगरपालिका / महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचार्यांच्या पाल्यांसाठी ही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतिगृह शुल्क योजना राबविण्यात आली. ही योजना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुद्धा सुरु ठेवत असल्याचे संस्थाध्यक्ष मा. रवींद्रजी माने यांनी जाहीर केले असुन कोविड योध्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच सदर योजना पुढे सुरु ठेवत असलेबाबत संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.

Comments
Post a Comment